मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे ३९ आमदार सरकारसोबत नसल्याने विद्यमान महाविकास आघाडी अल्पमतात आलेली आहे. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बहुमत सिध्द करावे अशी मागणी आज भाजपतर्फे राज्यपालांना दिलेल्या पत्रातून केली आहे. अर्थात, आता मविआ सरकारची फ्लोअर टेस्टमध्ये कसोटी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज दिवसभरात आरोप-प्रत्यारोपांचा खेळ चांगलाच रंगला. शिवसेना आणि शिंदे गटाने एकमेकांवर जोरदार हल्ले चढविले. सायंकाळी कॅबिनेट बैठक झाल्यामुळे उध्दव ठाकरे राजीनामा देणार की काय असे वातावरण निर्माण झाले. तथापि, असे झाले नाही. याचा अर्थ ते अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकार्यांसह रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवनाला भेट दिली. त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशीष शेलार, प्रवीण दरेकर आदी नेत्यांची उपस्थिती होती.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही राज्यपालांना पत्र दिले असून यात राज्यातील सद्यस्थितीबाबत अवगत करण्यात आले आहे. शिवसेनेचे ३९ आमदार हे बाहेर असून मविआ सोबत रहायचे नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे बहुमत उरलेले नाही. यामुळे त्यांनी बहुमत सिध्द करावे अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालांच्या अधीन राहून राज्यपालांनी योग्य ते पावले उचलावीत अशी मागणी आपण ई-मेलद्वारे निवेदन पाठवून आणि प्रत्यक्ष भेऊन पत्र दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.