नवी दिल्ली वृत्तसंस्था । दिल्ली आणि एनसीआरमध्ये दोन ते चार दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या प्रजासत्ताक दिनी किंवा त्याआधी दिल्लीत ‘घात’ करण्याचा त्यांची काही योजना असू शकते, असे सांगितले जात असून याबाबत चौकशी केली जात आहे.
यावेळी एखाद्या पोलीस अधिकाऱ्यालाही लक्ष्य केले जाऊ शकते. २०१४ मध्ये तामिळनाडूत हिंदू नेते के. पी. सुरेश यांची हत्या केली होती. सध्या अटकेत असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या साथीदारांनी अलीकडेच एका पोलीस ठाण्यात घुसून उपनिरीक्षकाची हत्या केली होती. ख्वाजा मोइनुद्दीन, सैयद अली नवाज आणि अब्दुल समद उर्फ नूर अशी पकडल्या गेलेल्या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. हे तिघेही तामिळनाडूचे रहिवासी आहेत. या तिघांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांना दिल्लीत घातपात घडवण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी चौकशीत दिली आहे. त्यांना ‘टार्गेट’ देण्यात येणार होते. कधी, काय करायचे हे विदेशी हस्तक ठरवत असल्याची माहितीही त्यांनी चौकशीतून दिली. त्यामुळे आता दिल्ली हे त्यांचे पुढील लक्ष्य असू शकते, अशी माहिती समोर येत आहे.