नवी दिल्ली– स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानात प्रशिक्षण घेतलेले तालीबानी दहशतवादी भारतात घातपात घडवू शकतात असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
याबाबत वृत्त असे की, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केला आहे. यात पाकिस्तान लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने ईद-उल-फितरच्या नंतर जम्मू-काश्मीरमध्ये हल्ल्यासाठी २६ मे ते २९ मेदरम्यान २० तालिबानी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले आहे, असे नमूद करण्यात आले आहे. हे दहशतवादी तालीबानचे सदस्य असून त्यांना अफगाणिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले असल्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय भारत-नेपाळ सीमेवरून पाक सैन्य पाच ते सहा दहशतवाद्यांना भारतात पाठवण्याच्या तयारीत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आणि ५ ऑगस्ट रोजी अनुच्छेद ३७० हटविण्याच्या वर्धापन दिनानिमित्त हल्ला होऊ शकतो. तसेच, ५ ऑगस्टला अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानेही घातपाताचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.