यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चुंचाळे शिवारात सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राण्याचा त्याच्या कुटुंबासह वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता संजय फिरके आणि त्यांचा मुलगा शेतात फवारणीसाठी पाण्याच्या टाक्या भरून परत येत असताना त्यांना प्रकाश रामदास चौधरी यांच्या शेतातून रस्त्यावर बिबट्या सदृश प्राण्यांचे एक कुटुंब दिसले. त्यांनी प्रसंगावधान राखत दूरवरून फोटोही काढला. त्यांचा दावा आहे की दोन प्राणी रस्त्यावर होते, तर दोन रस्त्याच्या कडेला थांबले होते आणि हे सर्व प्राणी बिबट्याच होते. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच, वन विभागाचे आर.एफ.ओ. सुनील भिलावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी केली. मात्र तपासणीत वन विभागाने या प्राण्यांना बिबट्या नसून तडस असल्याचे सांगितले आहे. तरीही प्रत्यक्षदर्शी फिरके यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचा ठाम विश्वास आहे की ते बिबट्याच होते. यामुळे वन विभागाच्या निष्कर्षावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या संदर्भात श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. जी. तेली आणि अधीक्षक चंद्रकांत चौधरी यांनी उपवनसंरक्षक जमीर शेख यांना लेखी निवेदन देऊन परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा विषय गंभीर आहे, असे त्यांनी नमूद केले.
सहाय्यक वनरक्षक समाधान पाटील यांनी सांगितले की, मंगळवारी संध्याकाळपर्यंत वन विभागाचे विशेष पथक पुन्हा गावात पाठवले जाईल. तसेच, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वन्यजीवांपासून सुरक्षित राहण्याबाबत जनजागृती केली जाईल. गावातील चौकाचौकांमध्येही लोकांना मार्गदर्शन केले जाईल.
दरम्यान, नागरिकांनी वन्य प्राण्यांपासून स्वतःच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यात रात्री एकट्याने शेतात जाणे टाळणे, टॉर्चचा वापर करणे, पाळीव जनावरांची काळजी घेणे, घराबाहेर शौच टाळणे आणि कोणताही वन्यप्राणी दिसल्यास त्याला त्रास न देता वन विभागाला तात्काळ माहिती देणे अशा सूचना समाविष्ट आहेत.
वन विभागाने गस्त वाढवावी, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करावी, कॅमेरा ट्रॅप लावून प्राण्याचा नक्की प्रकार ठरवावा आणि नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे. विभागाने नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला पाहिजे आणि आवश्यक ती कार्यवाही तत्काळ केली पाहिजे, अन्यथा परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



