यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हिंदू संस्कृतीतील तेजस्वी गुरु-शिष्य परंपरेची आठवण करून देणारी आणि समाजात धर्मसंस्थापनेची प्रेरणा जागवणारी गुरुपौर्णिमा, यावर्षी १० जुलै रोजी देशभरात विविध ठिकाणी साजरी होणार आहे. सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील ६७ ठिकाणी या पावन गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील खंडेराव महाराज मंदिरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरु-शिष्य परंपरा हीच हिंदु संस्कृतीची आत्मा असून, श्रीकृष्ण-अर्जुन, समर्थ रामदास-शिवाजी महाराज, चाणक्य-चंद्रगुप्त, रामकृष्ण परमहंस-स्वामी विवेकानंद यांसारख्या अनेक थोर गुरु-शिष्यांनी धर्मसंस्थापना आणि राष्ट्रनिर्माणाची महान कामगिरी केली आहे. याच परंपरेचा गौरव करण्यासाठी सनातन संस्था सातत्याने समाजप्रबोधनाचे कार्य करत असून, गुरुपौर्णिमा हा त्याचा एक प्रेरणादायी भाग आहे.

डोंगर कठोरा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये श्री व्यासपूजन आणि परात्पर गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन) उत्साहात करण्यात येणार आहे. “आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यासाठी साधना” या विषयावर मान्यवर वक्त्यांचे सखोल मार्गदर्शनही होणार आहे. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना अध्यात्म, धर्म आणि राष्ट्रविषयक विचार ऐकण्याची तसेच ते आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.
महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र आणि धर्म या विषयांवर माहितीपर फलकप्रदर्शन लावण्यात येणार आहे. यामुळे उपस्थित नागरिकांना विचारवृद्धीसोबतच सजग नागरिक होण्याची दिशा मिळणार आहे. या निमित्ताने संपूर्ण परिसरातील हिंदू बांधवांनी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे जिल्हा सेवक दत्तात्रेय वाघुळदे यांनी केले आहे.



