जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ते नशिराबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एका अनोळखी व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने या तरुणाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.
नशिराबाद पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव-नशिराबाद रोडवरील लक्ष्मीनारायण हॉलजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अंदाजे ३५ वर्षीय असलेल्या या तरुणाला धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक वाहन घेऊन फरार झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) दाखल केला आहे. या दुर्घटनेची नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृताची ओळख पटवण्याचे आवाहन:
अपघातग्रस्त तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतदेहाचे वर्णन आणि माहितीसाठी नातेवाईकांनी नशिराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पवार हे करत आहेत.



