जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यात बुधवारी, ३ सप्टेंबर रोजी झालेल्या एका भीषण अपघातात जळगाव शहरातील टी.एम. नगर येथील लक्ष्मी विराणी (वय २५) या महिला पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रामपूर तालुक्यातील बिथल परिसरातून पर्यटकांना घेऊन जाणारी एक बस जात असताना अचानक दरड कोसळल्याने हा अपघात झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून १५ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे जळगावातील सिंधी कॉलनी परिसरावर शोककळा पसरली आहे.

बसवर दरड कोसळून अपघात
हा अपघात बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हिंदुस्तान-तिबेट मार्गावर बिथल परिसरात घडला. पर्यटकाचा घेऊन जाणारी खासगी बस प्रवास करत असताना अचानक डोंगरावरून मोठे दगड कोसळले. यामध्ये बसला मोठा धक्का बसला आणि अपघातात दोन पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये जळगावमधील लक्ष्मी विराणी यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत १५ हून अधिक भाविक जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाची तातडीची मदत
या अपघाताची माहिती मिळताच जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने शिमला येथील प्रशासनाशी संपर्क साधला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना बसमधून बाहेर काढून त्यांना महात्मा गांधी वैद्यकीय सेवा केंद्र, खानरी (रामपूर उपजिल्हा) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मृतदेह रामपूर उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाच्या समन्वय आणि प्रयत्नांमुळे पुढील प्रक्रिया जलद झाली.
मृतदेह जळगावकडे रवाना
दुर्घटनाग्रस्त लक्ष्मी विराणी यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर जळगावकडे पाठवण्यात आला आहे. गुरुवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता रामपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईक आणि मित्र परिवारासोबत खासगी रुग्णवाहिकेतून जळगावकडे रवाना झाला. या दुर्दैवी घटनेमुळे लक्ष्मी विराणी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



