भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील वर्दळीच्या अप्सरा चौक परिसरात आज सकाळी मोटारसायकल लावण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाने काही वेळातच तणावाचे स्वरूप धारण केले. या घटनेचे पडसाद थेट छबीलदास कपडा मार्केटमध्ये उमटल्याने बाजारपेठेतील व्यवहार ठप्प झाले.

अप्सरा चौकात सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दुकानासमोर मोटारसायकल उभी करण्यावरून एका लोडगाडी चालक आणि दुकानदारामध्ये शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला साधा वाद वाटणारी ही बाब काही वेळातच वाढत गेली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वाद वाढत असल्याची माहिती मिळताच आसपासच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने छबीलदास कपडा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. अचानक दुकाने बंद झाल्यामुळे बाजारात आलेल्या ग्राहकांची मोठी गैरसोय झाली असून काही काळ बाजारपेठ पूर्णपणे ओस पडल्याचे चित्र दिसून आले.
घटनेनंतर व्यापारी आणि ठेलेवाले मोठ्या संख्येने बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. परिस्थिती अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत अप्सरा चौक व परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला.
अप्सरा चौक हा शहरातील अत्यंत गजबजलेला भाग असल्याने या घटनेचा परिणाम वाहतुकीवरही झाला. काही काळ वाहनांची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून संपूर्ण घटनेचा पुढील तपास बाजारपेठ पोलिसांकडून सुरू आहे.



