Home राजकीय छत्रपती संभाजीनगर मतमोजणी केंद्रावर तणाव, शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज ; माजी महापौर विकास...

छत्रपती संभाजीनगर मतमोजणी केंद्रावर तणाव, शिवसेना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज ; माजी महापौर विकास जैन जखमी


छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। । राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळपासूनच तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज येथील मतमोजणी केंद्रावर मोठी गर्दी झाल्याने आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना घडली असून, या प्रकारामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार असतानाच पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात उमेदवारांचे प्रतिनिधी आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. मतमोजणी केंद्राच्या आत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक कार्यकर्ते एकाच वेळी धाव घेत असल्याने गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींना पोलिसांनी आत प्रवेश नाकारला, यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वादावादी सुरू झाली.

पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही गर्दी कमी न झाल्याने आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे लक्षात आल्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या लाठीचार्जमध्ये शिवसेनेचे काही कार्यकर्ते जखमी झाले असून माजी महापौर विकास जैन यांनाही पोलिसांच्या लाठीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

लाठीचार्जनंतर विकास जैन यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांनी एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचे सांगत दोषी पोलिसांवर तात्काळ कारवाईची मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर धरणे आंदोलनाला बसले असून, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मतमोजणी सुरू करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे काही काळ मतमोजणी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Protected Content

Play sound