Home प्रशासन रावेर-चोरवड ११ किमी अंतरासाठी ५० कोटींच्या निविदा प्रसिद्ध

रावेर-चोरवड ११ किमी अंतरासाठी ५० कोटींच्या निविदा प्रसिद्ध


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहर ते मध्य प्रदेश सीमेपर्यंतच्या ११ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी अखेर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ५० कोटी ६२ लाख रुपयांचे ई-टेंडर प्रसिद्ध केले आहे. या निर्णयामुळे बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर हा नवीन राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराच्या मुख्य भागातून जाण्याची आशा आता पूर्णपणे मावळली असून, सध्या अस्तित्वात असलेल्या रावेर-चोरवड मार्गाचेच मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रस्त्याच्या मजबुतीकरणावर भर :
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर प्रादेशिक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्यातील NH-753BE या महामार्गावरील कामांना गती देण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा सूचनेनुसार, रावेर शहर ते मध्य प्रदेश सीमेपर्यंतच्या ११ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे नूतनीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण ५० कोटी ६२ लाख ८३८ रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

जुनाच मार्ग होणार हायवे :
गेल्या अनेक दिवसांपासून बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग रावेर शहराच्या मध्यवस्तीतून किंवा नवीन नियोजित मार्गाने जाईल, अशी चर्चा होती. मात्र, आता NHAI कडून थेट जुन्याच मार्गाच्या मजबुतीकरणासाठी ई-टेंडर काढण्यात आल्याने, नवीन मार्गाचा प्रस्ताव गुंडाळला गेल्याचे चित्र आहे. यामुळे रावेर ते चोरवड दरम्यानच्या प्रवाशांना दिलासा मिळणार असला, तरी शहरातून महामार्ग नेण्याची मागणी करणाऱ्या नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था थांबणार असून, वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मदत होईल, असे बोलले जात आहे.


Protected Content

Play sound