दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. यादरम्यान आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीमध्ये पुन्हा सत्तेत आलो तर ‘पुजारी ग्रंथी सन्मान योजना’ सुरू करणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे. महिलांना रोख रक्कम देण्याच्या योजनेनंतर आता या नव्या योजनेअंतर्गत हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वारामधील ग्रंथींना दर महिना १८,००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे.
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाकडून ही घोषणा करण्यात आली आहे. केजरीवाल यांचा पक्ष सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. “पुजारी आणि ग्रंथी हे आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत, परंतु ते अनेकदा दुर्लक्षित राहिलेले घटक आहेत . देशात प्रथमच आम्ही त्यांना आधार देण्यासाठी एक योजना आणत आहोत, ज्या अंतर्गत त्यांना १८,००० रुपये मासिक भत्ता मिळेल,” असे केजरीवाल म्हणाले आहेत. या योजनेची नोंदणी उद्यापासून सुरू होईल असेही त्यांनी यावेळी जाहीर केले. मंगळवारी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराला भेट देऊन तेथील पुजार्यांच्या नोंदणी प्रक्रियेची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.