मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवी मुंबईकरांची विमानतळावरून उड्डाणे सुरू होण्याची प्रतीक्षा १७ एप्रिल रोजी संपणार आहे. यासंदर्भात विजय सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ एप्रिलपासून इथून प्रवासी व मालवाहतूक सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. “छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापेक्षा या विमानतळाची क्षमता दुप्पट असेल. पहिल्या टप्यात वर्षाला २ कोटी प्रवासी वाहतूकीची क्षमता असेल. टर्मिनल इमारतीचे ८४ टक्के काम पूर्ण झाले असून चारही टर्मिनल स्वयंचलित यंत्रणेद्वारे एकमेकांना जोडले आहेत”, असं ते म्हणाले.
दरम्यान, अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी १७ एप्रिलच्या मुहूर्ताला दुजोरा दिला आहे. “आम्ही नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी १७ एप्रिलचं लक्ष्य निश्चित केलं आहे. विमान उड्डाण परवाना मिळाल्यानंतर ७० दिवसांत उद्घाटन केलं जाऊ शकतं. त्यानुसार ही तारीख आम्ही निश्चित केली आहे. ६ फेब्रुवारीला विमान उड्डाण परवाना मिळण्याची शक्यता आहे”, असं बन्सल यांनी नमूद केल्याचं इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे.