अमळनेर (ईश्वर महाजन)तालुक्यातील ढेकू बु. येथे काल (दि.१९) होणार असलेला एका अल्पवयीन मुलीचा विवाह संबंधितांना समज देत थांबवण्यात आल्याची घटना घडली. यामुळे समाज देणाऱ्या सूज्ञ व्यक्तींचे कौतुक केले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील आधार संस्था संचलित महिला समुपदेशन केंद्राला तालुक्यातील ढेकू बु. येथे एका अल्पवयीन मुलीचा नंदुरबार येथील शनीमांडळ या गावी रविवारी विवाह होणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. संस्थेच्या भारती पाटील व रेणू प्रसाद यांनी येथील पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्याशी संबंधित विषयावर चर्चा करून त्यांना या प्रकाराची माहिती दिली. संस्थेच्या भारती पाटील, रेणू प्रसाद व जयश्री ठाकरे यांनी पो.कॉ. प्रवीण पाटील व मधुकर पाटील यांच्यासह ढेकू येथे जाऊन या प्रकाराची खात्री केली असता कुटुंबीय विवाहाच्या तयारीत होते. सगळ्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला बोलावून जबाबदारीने समज दिली. त्यानंतर नियोजित विवाह थांबवण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती नंदुरबार पोलीस स्टेशनला कळवण्यात आली असता त्यांनीही मुलाकडील लोकांना बोलावून समज दिली. येथील तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, पो.कॉ.प्रवीण पाटील, मधुकर पाटील तसेच आधार संस्थेच्या भारती पाटील व रेणू प्रसाद यांनी या कारवाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली.