भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील शिंदी गावात आजी -आजोबांकडे आलेल्या एका तरुणाने येथील तापी नदीच्या पुलावरुन सोमवार रोजी सायंकाळी अचानक पाण्यात उडी मारून जिवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बचाव दल पथकाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित पाण्यात उडी मारून सुमारे एक किलोमीटर अंतर प्रवाहात वाहून गेलेल्या युवकाला शोधले व त्याचे प्राण वाचविले. बचाव पथकाच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
तालुक्यातील शिंदी गावात आजी-आजोबांकडे आलेला सुमित गणेश महाजन (वय २८, रा.बीड, जि.खंडवा (म.प्र ) हा युवक आपल्या आईसोबत तापी पुलावरुन जात होता. तेव्हा त्याने अचानक तापी नदित उडी मारली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान बचाव शोध पथकाचे अरुण रंधे, अशोक सोनवणे यांच्यासह सहकाऱ्यांनी त्वरित पाण्यात उडी घेवून सुमितचा शोध घ्यायला सुरुवात केली. सुमित हा प्रवाहात सुमारे एक किलोमीटर दूर वाहून गेला होता. परंतु दैव बलवत्तर म्हणून सुमितला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, सुमित मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले. माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे पो हे कॉ सुपडू पाटिल व मोहन पाटिल यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली होती.