मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आजवर अनेकदा ईडीने समन्स बजावून देखील चौकशीसाठी न गेल्यामुळे आज खासदार संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे ईडीचे पथक दाखल झाले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याचे वृत्त असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पत्रा चाळ प्रकरणात या आधीच सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना पाच वेळेस चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. मात्र ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. या पार्श्वभूमिवर, आज भल्या पहाटेच ईडीचे पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खासदार संजय राऊत हे भाजप आणि शिंदे गट यांच्यावर घणाघाती टीका करत आहेत. यामुळे त्यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्यात येईल असे मानले जात होते. या पार्श्वभूमिवर आज पहाटेचे ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.