गॉल वृत्तसंस्था । भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. आणि ट्वेंटी-20 (3-0) पाठोपाठ टीम इंडियाचे वन डे मालिका जिंकण्याचे लक्ष्य आहे. भारतीय संघ यजमान वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्याची मालिका खेळणार आहे. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारतीय संघ या मालिकेत फेव्हरिट आहे. पण, त्यांचे हे अव्वल स्थान धोक्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, वर्ल्ड कप स्पर्धेतील उपविजेता न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात बुधवारपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी न्यूझीलंडला आहे. त्यांच्या खात्यात सध्या 111 गुण आहेत, तर अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या खात्यात 113 गुण आहेत. न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने श्रीलंकेला नमवल्यास ते अव्वल स्थानावर विराजमान होऊ शकतात. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमुळे कसोटी क्रिकेटमधील प्रत्येक सामना चुरशीचा होणार आहे. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे.