लंडन वृत्तसंस्था । दणकेबाज फलंदाजीला गोलंदाजांची साथ मिळाल्याने भारताने विश्वचषकातील महत्वाच्या सामन्यात गतविजेच्या ऑस्ट्रेलियास सहज पराभूत केले.
ओव्हल येथील मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवनचं दमदार शतक आणि कर्णधार कोहलीच्या ८२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचा डोंगर उभारला. वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचलेली भारतीय संघाची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यात सलामीवीर रोहितसह महेंद्रसिंग धोनी, हार्दीक पांड्या आदींनी चमकदार फलंदाजी केल्याने कागांरूंसमोर साडे तीनशेच्यावर धावांचे आव्हान मिळाले.
दरम्यान, भले मोठे आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीविरांनी सावध फलंदाजी केली. त्यांनी अर्धशतकी भागिदारी केली. यानंतर मात्र वैयक्तिक ३६ या धावसंख्येवर कर्णधार फिंच धावबाद झाला. डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक पूर्ण केले तरी धावांची गती वाढविण्याच्या नादात त्याला चहलने त्याला ५६ धावांवर तंबूत धाडले. स्टीव्ह स्मिथने अर्धशतक झळकावले. तर जोरदार फलंदाजी करणारा उस्मान ख्वाजा ४२ धावांवर बाद झाला. यानंतर यष्टीरक्षक अलेक्स कॅरीने फटकेबाजी केली. मात्र याचा लाभ झाला नाही. यामुळे भारताने हा सामना ३६ धावांनी जिंकला. यात शिखर धवनला सामनाविराचा सन्मान मिळाला.