जळगाव प्रतिनिधी । रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टतर्फे मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
शिक्षक करीत असलेल्या कार्यात त्यांचे वेगळेपण, गुण त्यांना सत्कारास पात्र करतात. त्यामुळे त्यांनी हा आयुष्यातील ठेवा उंचीवर न्यावा, जपावा निश्चितच विद्यार्थ्यांच्या प्रगतीमुळे त्यांचे मन कृतज्ञतेने भरुन येईल असे केशव स्मृती सेवा समूहाचे अध्यक्ष भरत अमळकर यांनी प्रतिपादन केले. ते आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
पुढे बोलतांना अमळकर यांनी कोरोना पेक्षा शाळा बंद असल्यामुळे एक पिढी उध्वस्त होण्याची भिती व्यक्त केली. ऑनलाईन शाळेमुळे विद्यार्थी कंटाळले असून त्यांचे आकलन बंद झाले आहे. शाळा ही केवळ शिक्षण देत नाही तर जीवन मूल्ये शिकवते. कोरोनामुळे अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांमध्ये आर्थिक विषमता निर्माण झाल्याचे ही त्यांनी सांगितले.
कोरोनासह जगावे लागणार असल्यामुळे शिक्षक व पालकांनी एक पाऊल पुढे टाकून कोरोनाची चिंता करण्यापेक्षा त्याची काळजी घेऊन शाळा, कॉलेज सुरु करण्यासाठी आग्रह धरुन लढायला शिकले पाहिजे असे त्यांनी शेवटी आवाहन केले,
रोटरी वेस्टतर्फे मुख्याध्यापक पदमाकर पाटील (टाकरखेडा), मुख्याध्यापक हेमेंद्र सपकाळे (धामणगांव), उपशिक्षक भरत सुर्यवंशी (टाकरखेडा), डॉ.दिपक नारखेडे (संशोधन), उपशिक्षक गणेश महाजन (टाकरखेडा), प्रा. डॉ.पवन पाटील (मारवड, अमळनेर), विलास निकम (लोहारा, ता.पाचोरा), प्रा.डॉ.रणजित पाटील (क्रिडा शिक्षक), प्रा. समीर घोडेस्वार (क्रिडा शिक्षक), तरुण भाटे (कलाशिक्षक), सोमनाथ महाजन (ला.ना. हायस्कूल), अश्विन तिलकपुरे (नृत्यशिक्षक) आदि 12 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार शाल, श्रीफळ देऊन कुटुंबीयासह गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र देशमुख यांनी तर परिचय अॅड. सुरज जहाँगीर यांनी करुन दिला. संचित जोशी याने गुरुवंदना तर प्रविण जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमास सुनील सुखवाणी, गौरव सफळे, डॉ. कल्पेश गांधी, सरिता खाचणे, महेश सोनी, अतुल कोगटा, योगेश राका, सुदाम वाणी, घमेंडीराम सोनी, सचिन वर्मा, ललीत वर्मा आदिंची उपस्थिती होती.