नवी दिल्ली वृत्तसंस्था । मागणी कमी झाल्यामुळे आणि वाढीव उत्पादन खर्चामुळे टाटा स्टीलने कर्मचार्यांच्या कपातीवर विचार करण्यास सुरुवात केली आहे. टाटा स्टील जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. तसेच भारतात टाटा स्टीलला दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाला आहे.
रॉयटर्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी टाटा स्टीलचे युरोपातील मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरिक एडम यांनी कर्मचारी कपातीचे संकेत दिले होते. मात्र, त्यावेळी कंपनीकडून निश्चित आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती. मात्र, आता टाटा स्टीलने अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. जवळपास तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा विचार कंपनीने सुरू केला आहे. विक्रीत वाढ करणे, तसेच युरोपातील साधारण तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणे आणि कामगिरीत सुधारणा करण्याची योजना कंपनीने तयार केल्याचे समजते आहे.
टाटा स्टीलच्या माहितीनुसार, मागणीत झालेली घट, व्यापारी अडचणी आणि अन्य समस्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागला. ज्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात येणार आहे. त्यातील दोन-तृतीयांश कर्मचारी हे कार्यालयात काम करणारे असतील. मात्र, प्रकल्प बंद करण्यात येणार नाही, असे ही कंपनीने स्पष्ट केले आहे. टाटा स्टीलच्या भारतातील व्यवसायाबाबत विचार केला तर, कंपनीचा दुसऱ्या तिमाहीत २५५.८९ कोटींचा तोटा झाला आहे. मागील वर्षीच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीला ६०.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.