पाचोरा, प्रतिनिधी । कोरोना महामारीत तालुक्यातील तारखेडा उपकेंद्रात ठेकेदाराच्या मनमानी कारभारासह अधिकाऱ्यांची दुर्लक्षामुळे गेल्या सहामहीन्यापासून विविध समस्यांना तोंड देत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केल्यानंतर रणरणत्या उन्हात कॉग्रेस पदाधिकारी धडकले.
कोरोना महामारीत ग्रामीण भागात उपकेंद्र अद्यावत ठेवणे अग्रक्रम असतांना पाचोरा तालुक्यातील लोहटार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या तारखेडा उपकेंद्रात एन.आर.एच.एम.अतंर्गत दुरुस्तीचे साडे चार लाख रुपयांचे काम सुरू आहे. हे काम गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरु झाले. रंगकाम व्यतिरिक्त फारसे काही काम झालेले नाही. यातच संबंधित ठेकेदाराने आपल्या मनमानी कारभारामुळे कामातील अडगळ सामान तेथेच ठेवल्याने उपकेंद्रात संबंधित कर्मचाऱ्यांना काम करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे याबाबतची तक्रार कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्याकडे ग्रामस्थांनी करताच सचिन सोमवंशी हे आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन रणरणत्या उन्हात या ठिकाणी गेले असता या केंद्रात समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या. यात एकाच कामावर दोन वेळा पैसे खर्च करून देखील काम निकृष्ट दर्जाचे दिसुन आले. यावेळी सचिन सोमवंशी यांनी संबंधित अधिकारी शाखा अभियंता श्री. भावसार यांना मोबाईलवरुन कॉल करुन उपकेंद्रांचे काम तात्काळ करा आणि आजच ठेकेदाराचा अडगळ सामान बाहेर काढून कोरोना महामारीत उपकेंद्रात स्वच्छता करुन संबंधित कर्मचारी श्रीमती तिरमले यांना ताब्यात द्या असे सांगितले. या कामाची चौकशी करुन सबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाईची मागणी सचिन सोमवंशी यांनी शेवटी केली आहे. यावेळी कॉग्रेस पदाधिकारी गणेश पाटील, धनंजय पाटील, राहुल शिंदे, भारत पाटील, ग्रामस्थ जगदीश पाटील, महेश गोसावी उपस्थित होते.