धाराशिव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे टँकरने दोन शाळकरी मुलींना चिरडले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. ही भीषण घटना बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. श्रेया पात्रे असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी सोलापूर हैदराबाद – महामार्गा रोखून धरला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूक तुंबली असून, वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. अपघात घडताच संतप्त नागरिकांनी टँकरचालकास अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले.
कॅप्टन जोशी विद्यालयातील दोन विद्यार्थिनी श्रेया सुरेश पात्रे (इयत्ता सातवी) व श्रद्धा श्रीकांत कांबळे (इयत्ता सहावी) या बुधवारी पावणे दहाच्या सुमारास सकाळी रस्त्याच्या कडेने शाळेला जात होत्या. तेव्हा जनावर बाजार मैदानासमोरून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या टँकरने चिरडल्याने श्रेया पात्रे हीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी विद्यार्थिनी श्रद्धा कांबळे ही गंभीर जखमी झाली आहे.
अपघात होताच ग्रामस्थांनी जखमी मुलीस उमरगा येथे उपचारासाठी पाठवले, पण ती अधिक गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला सोलापूर येथे पाठवण्यात आले. मृत मुलीस प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान या टँकरने एका सायकलस्वारास चिरडले असते. मात्र, तो बालंबाल बचावला, तर सायकलीचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावर चिमुकल्या विद्यार्त्यांच्या पालकांनी हंबरडा फोडला होता.
येणेगूर येथील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थानी दोन्ही बाजूचा मार्ग अडवला. प्रशासनाचा निषेध करीत आम्हाला न्याय पाहिजे, म्हणत जिल्हाधिकारी व संबंधित मक्तेदार आल्याशिवाय महामार्ग मोकळा केला जाणार नाही, असा पवित्रा घेत केवळ मक्तेदाराच्या हलगर्जीमुळे महामार्गावर आणखी किती बळी घेणार, असा जाब विचारला आहे. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने लांबचा लांब रांगा लागल्या होत्या.
सोलापूर-हैदराबाद महामार्गाचे काम येणेगुर परिसरात अनेक महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. हे काम लवकर पूर्ण करावे, अशी ग्रामस्थ मागणी करत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे.