
नाशिक-वृत्तसेवा । नाशिक शहरात भोंदूबाबा प्रकरणानंतर आता आणखी एका धक्कादायक घटनेने खळबळ उडवली आहे. सातपूर परिसरातील एका व्यावसायिकाच्या आक्षेपार्ह व्हिडिओंवरून त्याला ब्लॅकमेल करत 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, या सर्व घडामोडींमुळे शहरात पुन्हा एकदा ‘खरात पॅटर्न 2’ची चर्चा रंगू लागली आहे.

नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच सातपूर परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित व्यावसायिकाच्या टॅबमध्ये शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मोठी रक्कम उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, व्यावसायिकाच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तींनीच हा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. विश्वासू कर्मचाऱ्यांकडूनच अशा प्रकारे ब्लॅकमेलिंग केल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत कारवाई केल्यामुळे हे व्हिडिओ व्हायरल होण्यापासून थांबवण्यात यश आले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात हार्ड डिस्क चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्राथमिक तपासात ही हार्ड डिस्क फिर्यादीकडे काम करणाऱ्या व्यक्तीनेच चोरल्याचे स्पष्ट झाले. या हार्ड डिस्कमध्ये सुमारे 100 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याचे समोर आले असून, त्याच आधारे व्यावसायिकाला ब्लॅकमेल करण्यात येत होते.
सातपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून दोन पेनड्राईव्ह आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.



