फैजपूर (प्रतिनिधी) एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. त्या निमित्त महाविद्यालयाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसोबत सत्कार समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. वंदना बोरोले यांनी सांगितले की महाविद्यालय विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आलेले आहे त्यामुळे महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख हा चढता आलेख आहे. विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास व मेहनत करून यश प्राप्त केलेले आहे. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. चौधरी यांनी सांगितले की, यश प्राप्त करत असताना तुमच्या शिक्षकांना व आई वडिलांना कधीही विसरू नका. जीवनाच्या वाटेवर यश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनतीची व कष्टाची गरज असते आणि आता खऱ्या अर्थाने तुमची महाविद्यालयीन वाटचाल सुरू होणार आहे, तेव्हा खूप खूप अभ्यास करून स्वतःचे भविष्य उज्वल करा. यावेळी सावदा येथील नगरसेवक राजेश वानखेडे उपस्थित होते. सूत्रसंचालन तिलोत्तमा चौधरी यांनी केले तर आभार सचिन पाटील यांनी व्यक्त केले.