सहा हजारांची लाच भोवली : तलाठी अटकेत

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ६,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे.

महेशकुमार भाईदास सोनावणे यांनी शेतातील ९ प्लॉटवर एन.ए.च्या नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात एका ४२ वर्षीय तक्रारदाराकडून प्रत्येक नोंदीसाठी १,१३० रुपये प्रमाणे एकूण १०,१७० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ६,००० रुपये स्वीकारताना त्यांना सापळा कारवाईत आज अटक करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जळगाव युनिटने यशस्वीपणे पार पाडली. तक्रारदार आणि त्यांच्या भावाच्या शेतातील प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी आरोपीने लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे तसेच पोलीस हवालदार किशोर महाजन, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाणे आणि पोळयांच्या पथकाने केली.

Protected Content