तलाठीला धक्काबुक्की करत वाळूचे डंपर पळविले; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । दादावाडी परिसरातील आर.एल. हॉस्पिटलसमोरून जवळ अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करताना तलाठीला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात डंपर चालकासह मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील दादावाडी परिसरातील आर.एल.हॉस्पिटलसमोरून शनिवारी १२ मार्च रोजी बेकायदेशीररित्या डंपरद्वारे वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका महसूल विभागाला मिळाली. त्यानुसार तलाठी राजू बऱ्हाटे यांनी शनिवार १२ मार्च रोजी रात्री ११ वाजता धडक कारवाई करत अवैध वाळूने भरलेले डंपर (एमएच १९ सीवाय ४४१४) पकडले. डंपर चालकाला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर डंपर मालक आनंद इंगळे व डंपर चालक सागर ( पूर्ण नाव माहित नाही) यांनी तलाठी यांना धक्काबुक्की देऊन डंपर घेऊन पसार झाले. याबाबत तलाठी यांनी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रविवार १३ मार्च रोजी सकाळी डंपर चालक सागर (पूर्ण नाव माहीत नाही )आणि मालक आनंद इंगळे रा. आव्हाने ता. जि. जळगाव या दोन विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.

Protected Content