जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे वाळू डंपरला अटकाव करण्याचा प्रयत्न करणार्या तलाठ्यासह कोतवालास तस्करांनी धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार आज घडला आहे.
जामनेर तालुक्यातील पळासखेडे मिराचे येथे म्हसावदकडुन येणारे वाळुने भरलेले डंपर नंबर एमएच १९ जीवाय ५२७२ हे येत होते. या भागात तलाठी मोहन महाजन,कोतवाल जगन कुंभार यांनी डंपरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालक भरधाव वेगाने पुढे गेला. त्यांनी पाठलाग केला असता गावाजवळ डंपर थांबविण्यात आले. यावेळी वाळू तस्करांनी तलाठी मोहन महाजन व कोतवाल जगन कुंभार यांना धक्काबुक्की केली.
या प्रकरणी तलाठी मोहन प्रकाश महाजन यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.