जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राजमालती नगरातील वाढीव वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसमोर येत्या काही दिवसांत ये-जा करण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर स्थानिक महिलांनी महानगरपालिकेकडे पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी करणारे निवेदन महापौर दीपमाला काळे यांना मंगळवार, २४ फेब्रुवारी रोजी देण्यात आले. खासगी जागेवरील डांबरीकरण आणि त्यानंतर जागा मालकाने सुरू केलेल्या कंपाउंडमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
दूध फेडरेशनजवळील राजमालती नगरातील गट नंबर ३२०/१ब/१ आणि ३२०/१ब/२ या परिसरातील रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून खासगी जागेतून ये-जा करत होते. हा मार्गच त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एकमेव आधार होता. दोन महिन्यांपूर्वी महानगरपालिकेतर्फे या भागात डांबरीकरणाचे काम करण्यात आले. मात्र संबंधित ठेकेदाराने खासगी मालकीच्या जागेवरही डांबरीकरण केल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली.

डांबरीकरण झाल्यानंतर संबंधित जागा मालकाने आपल्या जागेभोवती कंपाउंड उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत संपूर्ण मार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी जागा मालकाशी संवाद साधून आपली अडचण मांडली असता, त्याने केवळ पंधरा दिवसांची मुदत देत सध्या एक अरुंद बोळ ठेवण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे. मात्र त्यानंतर हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि आपत्कालीन सेवांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच या मार्गावर असलेली डीपी (विद्युत वितरण यंत्रणा) देखील हटविण्याची मागणी करण्यात आली आहे, कारण त्यामुळे रस्ता निर्माण करण्यास अडथळा निर्माण होत आहे.
महिलांनी एकत्र येत महानगरपालिकेकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली असून, प्रशासनाने लवकरात लवकर पर्यायी रस्ता उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदन देण्यासाठी मनिषा पारेराव, कुसुमबाई वानखेडे, उषा ब्राम्हणे, संघमित्रा मेढे, अरुणाबाई बनसोडे, कमलाबाई परदेशी, बबीताबाई सोनवणे, पुनम कदम, वैशाली अहिरे आणि मेहमुदाबाई शेख या महिला उपस्थित होत्या.



