पंढरपूर वृत्तसंस्था । सोलापूर जिल्हा परिषेदतील मोहिते-पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्याचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये मोहिते-पाटील कुटुंबातील दोन सदस्यांसह सहा जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. यावरुन मोहिते पाटील गट चांगलाच आक्रमक झाले असून ते म्हणाले, “आधी अजित पवारांवर कारवाई करा, मगच आमच्या सदस्यांना निलंबित करा,” अशी टीका जयसिंह मोहिते पाटलांनी केली आहे.
‘राज्याच्या सत्ताकारणात पक्षविरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली? अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्ष झाले त्यावेळी कोणती कारवाई केली? यासोबतच दिपक साळुंखे यांचा पराभव करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कारवाई झाली का?’ असे सवाल जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जयसिंह मोहिते पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांनी भाजपला मतदान केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, सुनंदा फुले, अरुण तोडकर, गणेश पाटील आणि मंगल वाघमोडे अशी कारवाई करण्यात आलेल्या सदस्यांची नावे आहेत.