रावेर प्रतिनिधी । रावेर वकिल संघातर्फे वकिलांची वकिली करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत येथील दिवाणी न्यायाधीश आर. एल. राठोड यांना निवेदन देण्यात आले आहे.
सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रावेर, निंभोरा व सावदा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याकामी काही पोलीस कर्मचारी आरोपी व त्यांच्या नातेवाईकांवर त्यांच्या ओळखीचे वकील लावा नाही. तर आम्ही पोलीस कोठडी मागू तुमचा जामीन होऊ देणार नाही, आम्ही सांगतो तोच वकिल लावा तरच जामीन होईल असा दबाव टाकून त्यांच्या ओळखीच्या वकीलास पोलीस स्टेशनमध्ये बोलवून कमिशन घेऊन कामे देतात. याबाबत अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे निवेदन दिले. त्याची गंभीर दखल घेऊन न्या. राठोड यांनी (दि.23) रोजी रावेर, सावदा व निंभोरा पोलीस निरीक्षक यांचे समवेत वकिलांची सयुक्तिक बैठक घेतली सदर बैठकीला न्या. आर. एल. राठोड, न्या. आर. एम. लोळगे, पो. नि. रामदास वाकोडे रावेर, स. पो. नि. महेश जानकर, पो. उप. निरीक्षक पवार सावदा व वकिल संघाचे पदाधिकारी तसेच सर्व वकिल मंडळी उपस्थित होते.
यावेळी रावेर, सावदा व निंभोरा येथिल पोलीस अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, जर कुणी पोलीस कर्मचारी असे कृत्य करीत असेल तर त्याचेवर कडक कारवाई करण्यात येईल. यावेळी वकिलांनी न्यायाधीश व पोलीस अधिकारी यांना सांगितले की जर हे कृत्य थांबले नाही तर याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक , पोलीस महा निरीक्षक व महाराष्ट्र व गोवा वकिल परिषद यांचे कडे करण्यात येईल सदर बैठकीत वकिल संघाचे अध्यक्ष व्ही. बी. कोंघे, सचिव बी. डी. निळे, जेष्ठ सदस्य प्रवीण पासपोहे,मधुसूदन चौधरी, आर. एन.चौधरी, गणेश अजनाडकर, जिजाबरव पाटील, विपीन गडे, योगेश गजरे, सुभाष धुंदले,सुरज चौधरी,जगदीश महाजन, सुदाम सांगळे, डी. ई. पाटील,शीतल जोशी, प्रमोद विचवे,रमाकांत महाजन, संदीप मेढे, जितेंद्र दांडगे, राकेश पाटील, तुषार महाजन यांच्यासह वकिल सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.