
यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर राज्य मार्गालगत, आठवडे बाजार परिसरात असलेल्या देशी दारूच्या दुकानामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, या दुकानावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन सादर करण्यात आले असून, वेळेत दखल न घेतल्यास आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


शिवसेनेच्या निवेदनात म्हटले आहे की, सदर देशी दारू दुकान मुख्य राज्य मार्गालगत असून, याच परिसरात आठवडे बाजारही भरतो. या बाजारात मोठ्या प्रमाणावर महिला व शाळकरी मुलींची वर्दळ असते. परंतु या दारू दुकानाजवळ नेहमीच दारू पिऊन उघडपणे उच्छाद मांडणाऱ्यांची गर्दी दिसून येते. त्यामुळे महिलांवर व मुलींवर अश्लील टिप्पण्या, त्रासदायक वागणूक दिली जाते. या प्रकारामुळे सामाजिक तणाव व जातीय ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच, दुकान चालक शासनाच्या अटी व नियमांचे पालन करत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआरपीच्या अधिक दराने विक्री, दुकानाच्या वेळेचे कोणतेही बंधन नसणे, परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांना मद्य विक्री करणे यासारख्या गंभीर बाबी निदर्शनास आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उबाठा) पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्काळ चौकशी करून संबंधित दारू दुकानावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


