अमळनेर प्रतिनिधी । शहरातील प्रबुध्द कॉलनीत रात्री उशीरापर्यंत सुरू असणारे बर्फ गोळा विक्रेते तसेच अन्य विक्रेत्यांमुळे त्रस्त झाले असून या प्रकरणी कारवाईची मागणी होत आहे.
याबाबत वृत्त असे की, उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी अखाद्य बर्फ गोळे, त्यापासून तयार होते असलेले विविध प्रकारचे सरबत तसेच कोल्ड्रिंक्स यांना चांगलीच पसंती मिळत आहे. दिवसा तर या ठिकाणांवर गर्दीत असतेच, पण रात्री उशिरापर्यंत ही दुकाने संबंधित दुकानदार ठेवत असतात. रात्रीच्या वेळी काही टारगट तरुण या ठिकाणांवर धुडगूस घालतात. शिवराळ भाषेत जोरजोरात बोलणे, बोंबा मारणे, आपसात मारहाण करणे असे प्रकार घडत आहेत. त्यात त्यांच्या वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न, सायलेन्सरचे फटाक्यासारखा आवाज यामुळे प्रबुद्ध कॉलनी वासीयांची झोप उडाली आहे. याशिवाय येथील बाया-बापड्यांना अपरात्री डॉक्टर, दवाखाना आदी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडायचे असेल किंवा बाहेरगावाहून घरी यायचे असलयास भीती वाटत आहे. यामुळे संबंधित दुकानदारांना समज देऊन निर्धारित वेळेत दुकाने बंद करण्यास सांगावे यासाठी नगरसेविका संदानशिव यांनी वेळोवेळी विनंती अर्ज संबंधित विभागांना केलेले आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते योगीराज संदनंशिव, कमलाकर संदानशिव, हृदयनाथ मोरे, रविंद्र सोनवणे आदींनी याबाबत तक्रारी केलेल्या आहेत. मात्र यावर कारवाई होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत.