पाकिस्तानातील अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात मोर्चे काढा – मोदी

modi

 

तुमकुर वृत्तसंस्था । सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा काढणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कडाडून टीका केली. जर तुम्हाला मोर्चाच काढायचा आहे आणि घोषणाच द्यायच्या आहेत तर त्या पाकिस्तान विरोधात द्या. तिथे अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात घोषणा द्या. तिथून भारतात आलेल्या अल्पसंख्यकांच्या समर्थनार्थ मोर्चे काढा, असे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी कर्नाटकमधील तुमकूर येथील जाहीर सभेत बोलत होते.

मोदी म्हणाले की, विरोधक हे पाकिस्तानमधून आलेले दलित, वंचित आणि पीडितांविरोधातच आंदोलन करत आहेत. पाकिस्तानचा जन्म धर्माच्या आधारे झाला आणि त्यावेळेसपासूनच तिथे इतर धर्मियांवर अत्याचार सुरू झाले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चनांवर सातत्याने अत्याचार होत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाकिस्तानमध्ये होणारा अत्याचार सहन न झाल्यामुळे लाखो लोकांना आपले घरदार सोडून भारतात यावे लागले आहे. पाकिस्तानने यांच्यावर अत्याचार केले मात्र विरोधक पाकिस्तानविरोधात नाही तर पीडितांविरोधात आंदोलन करत आहेत. पाकिस्तानमधून भारतात शरणागती पत्करलेल्या लोकांविरोधात मोर्चे आंदोलने होत आहेत. मात्र, अल्पसंख्यांकाविरोधात अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानविरोधात बोलण्यासाठी ह्यांच्या तोंडाला टाळे लावले आहे का, असा सवाल ही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना केला. पाकिस्तानमधून भारतात शरणागती पत्करलेल्या हिंदू आणि त्यातही दलितांना आपण वाऱ्यावर सोडू शकत नसल्याचे ही त्यांनी म्हटले. संसदेविरोधात आंदोलन करण्यापेक्षा पाकिस्तानला उघडं पाडणे आवश्यक असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केले. पाकिस्तानने मागील ७० वर्षात केलेल्या शोषणाविरोधात आंदोलन करायला हवं असेही मोदी म्हणाले.

Protected Content