Home Uncategorized ‘TAIT २०२५’ चा निकाल जाहीर ; १०,७७८ उमेदवार पात्र !

‘TAIT २०२५’ चा निकाल जाहीर ; १०,७७८ उमेदवार पात्र !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल आज, सोमवार, १८ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी एकूण २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.

ही परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने २७ मे ते ३० मे २०२५ आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. राज्यातील २६ जिल्ह्यांमधील ६० परीक्षा केंद्रांवर या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

बी.एड. आणि डी.एल.एड. परीक्षेसंदर्भातील आकडेवारीनुसार, बी.एड. परीक्षेसाठी १५,७५६ आणि डी.एल.एड. परीक्षेसाठी १,३४२ असे एकूण १७,०९८ उमेदवार प्रविष्ट झाले होते. त्यापैकी बी.एड. चे ९,९५१ आणि डी.एल.एड. चे ८२७ असे मिळून एकूण १०,७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, ज्या उमेदवारांनी आवश्यक व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत परीक्षा परिषदेकडे सादर केलेली नाहीत, अशा ६,३२० उमेदवारांचा (बी.एड. ५,८०५ आणि डी.एल.एड. ५१५) निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

निकालासंबंधीची गुणयादी आणि गुणपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले गुणपत्रक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत डाउनलोड करून घ्यावे, असे परिषदेने कळविले आहे. विहित मुदतीपर्यंत गुणपत्रक डाउनलोड न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील आणि त्यानंतर कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे परिषदेने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound