कोलंबो-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत झिम्बॉब्वेने सर्वांना चकित करत आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियानंतर आता त्यांनी श्रीलंकेलाही त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करत 6 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह झिम्बॉब्वेने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवत ब गटात अव्वल स्थान पटकावले आहे.
सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 बाद 178 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणाऱ्या पाथुम निस्संकाने पुन्हा एकदा चमकदार खेळी करत 62 धावा केल्या. पवन रतनायकेने 44 धावांचे योगदान दिले, तर Kusal Pereraने 22 धावा करत संघाला स्पर्धात्मक धावसंख्या उभारून दिली.

179 धावांचे आव्हान झिम्बॉब्वेने केवळ 19.3 षटकांत पूर्ण केले. ब्रायन बेनेटने नाबाद 63 धावांची संयमी आणि प्रभावी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार Sikandar रझाने 45 धावा करत संघाला स्थैर्य दिले, तरतदिवानाशे मारुमणीने 34 धावांची महत्त्वपूर्ण साथ दिली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल सिकंदर रझा याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.
या विजयामुळे झिम्बॉब्वेच्या आत्मविश्वासात मोठी वाढ झाली आहे. त्यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियालाही पराभूत केले असून ओमानवरही मात केली आहे. आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे झिम्बॉब्वेकडे एकूण 7 गुण जमा झाले असून ते ब गटात पहिल्या स्थानावर आहेत, तर श्रीलंका 6 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
साखळी फेरीत बलाढ्य संघांना पराभूत केल्यानंतर आता सुपर 8 मध्ये झिम्बॉब्वेसमोर आणखी कठीण आव्हान उभे आहे. त्यांना दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि भारत यांसारख्या बलाढ्य संघांचा सामना करावा लागणार आहे. 23 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध, 26 फेब्रुवारीला भारताविरुद्ध आणि 1 मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांचे सामने होणार आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी झिम्बॉब्वेला अशीच सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी करावी लागणार आहे.



