अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचला असून जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जेतेपदाची लढत रंगणार आहे. या सामन्याबरोबरच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष आयसीसीने जाहीर केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या बक्षीस रकमेवरही केंद्रित झाले आहे. विजेता आणि उपविजेता संघ दोघांनाही मोठ्या आर्थिक बक्षिसाचा वर्षाव होणार असल्याने ही स्पर्धा आर्थिकदृष्ट्याही भव्य ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) टी-२० विश्वचषक २०२६ साठी तब्बल १२० कोटी रुपयांच्या प्राइज पूलची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे मागील हंगामाच्या तुलनेत यंदाच्या बक्षीस रकमेतील वाढ जवळपास २० टक्क्यांनी करण्यात आली आहे. विजेता आणि उपविजेता संघांव्यतिरिक्त उपांत्य फेरीत पोहोचलेल्या तसेच सुपर ८ आणि पहिल्या फेरीत बाद झालेल्या संघांनाही बक्षीस रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी प्रत्येक संघाला आर्थिक फायदा होणार आहे.

स्पर्धेचा विजेता ठरणाऱ्या संघाला सुमारे ३ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २७ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. तर अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या उपविजेत्या संघालाही सुमारे १४ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांवर पैशांचा अक्षरशः वर्षाव होणार आहे.
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे चार संघ पोहोचले होते. सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना प्रत्येकी सुमारे ७.२४ कोटी रुपये बक्षीस मिळणार आहे. याशिवाय स्पर्धेत पाचव्या ते बाराव्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना सुमारे ३.४८ कोटी रुपये दिले जाणार आहेत, तर तेराव्या ते विसाव्या क्रमांकावर राहिलेल्या प्रत्येक संघाला सुमारे २.२९ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहे.
दरम्यान, भारतीय संघासमोर इतिहास रचण्याची मोठी संधी उभी आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांनी प्रत्येकी दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने २००७ मध्ये महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा ही ट्रॉफी जिंकली होती, तर मागील हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले होते. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकत इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.



