Home क्रीडा टी20 वर्ल्ड कप 2026 ; फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच!  

टी20 वर्ल्ड कप 2026 ; फायनल नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच!  


मुंबई–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी टी20 आंतरराष्ट्रीय वर्ल्ड कप 2026 चा थरार पुन्हा एकदा भारत आणि श्रीलंकेत रंगणार आहे. २० संघांमध्ये स्पर्धेची चुरस असणार असून, या स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार असल्याचं वृत्त माध्यमांमधून पुढे आलं आहे. विशेष म्हणजे मुंबईत उपांत्य फेरीतील एक सामना होणार असल्याचंही समजत आहे.

बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर या स्पर्धेचं आयोजन भारतातील ५ आणि श्रीलंकेतील ३ शहरांमध्ये करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. भारतातील मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि चेन्नई ही शहरे सामने आयोजित करण्यासाठी जवळपास निश्चित झाली आहेत. तर श्रीलंकेतील शहरांबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा कालावधी 7 फेब्रुवारी ते 8 मार्च असा असण्याची शक्यता आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटनाचा तसेच अंतिम सामना रंगणार आहे. तर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सेमीफायनलमधील एक सामना पार पडेल.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान जर सेमीफायनलमध्ये आमनेसामने आले, तर त्यांचा सामना श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित केला जाईल, अशी शक्यता इंडियन एक्सप्रेसनं व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजनैतिक परिस्थितीमुळे आयसीसी स्पर्धांमध्ये हे संघ एकमेकांविरुद्ध त्रयस्थ स्थळीच भिडतात.

भारत आणि श्रीलंका हे या प्रतिष्ठित स्पर्धेचे संयुक्त यजमान असून, यजमान देशांतील स्टेडियमची अंतिम निवड लवकरच जाहीर होणार आहे. आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यातील उच्चस्तरीय बैठकीनंतर स्पर्धेचं वेळापत्रक निश्चित होईल. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असली, तरी क्रिकेटप्रेमींमध्ये या अपडेटमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

गेल्या टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार प्रदर्शन करत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. त्यामुळे भारतात होणारा आगामी वर्ल्ड कप भारतीय चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.

या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी स्टेडियम आणि वानखेडे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा महाकुंभ रंगणार असून, देशभरातील क्रिकेटप्रेमींसाठी ही पर्वणी ठरणार आहे.


Protected Content

Play sound