अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत अफगाणिस्तानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे सुपर 8 फेरीचे स्वप्न धूसर झाले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या थरारक डबल सुपर ओव्हर सामन्यात अफगाणिस्तानने जोरदार झुंज दिली, मात्र अखेरीस 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे डी ग्रुपमधील गुणतालिकेचे चित्र स्पष्ट होत असून अफगाणिस्तानसमोर आता कठीण गणित उभे राहिले आहे.
11 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या डी ग्रुपमधील या 13 व्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना डबल सुपर ओव्हरचा रोमांच अनुभवायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 188 धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 187 धावा करत सामना बरोबरीत आणला. पहिली सुपर ओव्हरही टाय झाली. दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेने 24 धावा केल्या, तर अफगाणिस्तानला केवळ 19 धावा करता आल्या आणि सामना त्यांच्या हातातून निसटला.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील सलग दुसरा सामना जिंकत सुपर 8 साठी आपला दावा मजबूत केला आहे. न्यूझीलंडनंतर डी ग्रुपमधून सलग दोन सामने जिंकणारा दक्षिण आफ्रिका हा दुसरा संघ ठरला आहे. गुणतालिकेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी असून दोन्ही संघ अजिंक्य आहेत. त्यामुळे या दोघांचे सुपर 8 मध्ये स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे.
प्रत्येक संघाला साखळी फेरीत चार सामने खेळायचे असून सुपर 8 मध्ये प्रवेशासाठी किमान दोन विजय आवश्यक आहेत. तसेच प्रत्येक गटातून पाच पैकी अव्वल दोन संघ पुढील फेरीत प्रवेश करणार आहेत. अफगाणिस्तानला सलग दोन पराभवांमुळे आता स्वतःच्या जोरावर पात्र होता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
अफगाणिस्तानचे उर्वरित सामने यूएई आणि कॅनडा विरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकून नेट रनरेट सुधारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. मात्र केवळ विजय पुरेसा ठरणार नाही; इतर संघांच्या निकालांवरही त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.
अफगाणिस्तानसाठी एक समीकरण असे आहे की न्यूझीलंड आणि यूएईने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणे आवश्यक आहे. तसेच कॅनडाने यूएईला आणि न्यूझीलंडने कॅनडाला हरवणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंड अव्वल स्थानी राहील, तर दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी चार गुण होतील. त्यावेळी नेट रनरेटच्या आधारे अफगाणिस्तानला संधी मिळू शकते.
दुसरे संभाव्य समीकरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड आणि यूएईला पराभूत करणे, कॅनडाने न्यूझीलंडवर विजय मिळवणे आणि यूएईने कॅनडावर मात करणे. अशा वेळी दक्षिण आफ्रिकेचे आठ गुण होतील, तर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान प्रत्येकी चार गुणांवर राहतील. त्यानंतर नेट रनरेट चांगला असल्यास अफगाणिस्तान सुपर 8 मध्ये प्रवेश करू शकतो.



