दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह २० संघ सज्ज झाले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टी-20 वर्ल्डकपचे १६ सामने यूएसएमध्ये खेळले जाणार आहेत, तर उर्वरित ३९ सामने कॅरेबियन बेटांवर खेळले जातील. या स्पर्धेत बाद फेरीसह एकूण ५५ सामने खेळले जातील. ही स्पर्धा २९ दिवस चालेल. तर टीम इंडिया ५ जूनपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
अ गटात असलेली टीम इंडिया आपले चारही साखळी सामने अमेरिकेत खेळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये अनेक संघ वेस्ट इंडिजच्या भुमीवर खेळतील. अशा परिस्थितीत या स्पर्धेच्या वेळेबाबत भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत आहेत. विश्वचषक सामना पाहण्यासाठी झोपेचा त्याग करावा लागणार का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात येत आहे. तर उत्तर ‘हो’ असे असू शकते. कारण स्पर्धेतील काही सामने भारतीय वेळेनुसार १२:३० वाजता सुरू होतील, तर अनेक सामने पहाटे ५ वाजता सुरू होणार आहेत.
भारतीय चाहत्यांच्या मनात निर्माण होणारे बहुतांश प्रश्न हे टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळेबाबत आहेत. भारतीय संघाचे सर्व लीग सामने अमेरिकेत होणार आहेत. पहिले ३ सामने न्यूयॉर्कमध्ये आणि शेवटचा लीग सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल. न्यूयॉर्कमध्ये खेळले जाणारे सामने स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू होतील. भारतीय वेळेनुसार हे तिन्ही सामने रात्री ८ वाजता सुरू होतील. फ्लोरिडामध्ये खेळल्या जाणाऱ्या टीम इंडियाच्या शेवटच्या लीग सामन्याची स्थानिक वेळ सकाळी १०.३० वाजता असेल. मात्र, भारतीय वेळेनुसार हा सामनाही रात्री ८ वाजता सुरू होईल.
विशेष म्हणजे स्पर्धेतील काही सामने सकाळी ५, ६, ८ वाजता सुरू होतील. तर टी-20 वर्ल्डकपचे काही सामने भारतीय वेळेनुसार रात्री ९, १०:३० आणि मध्यरात्री १२:३० वाजता सुरू होतील. टी-२०विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेत २० संघ सहभागी होणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. सर्व संघांची ‘अ’ ते ‘ड’ अशी चार गटात विभागणी करण्यात आली आहे.