
रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बियाणे विक्री प्रक्रियेसाठी सरकारने नव्याने लागू केलेल्या ‘साथी फेज-२’ पोर्टलमुळे कृषी विक्रेत्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या तांत्रिक अडचणींविरुद्ध आणि विक्रेत्यांच्या मागण्यांसाठी माफदा संघटनेतर्फे येत्या मंगळवारी २८ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे. या संदर्भात रावेर तालुका कृषी ऍग्रो डीलर्स असोसिएशनने रावेर तहसील कार्यालयात निवेदन सादर केले.

सध्या बियाण्यांच्या विक्रीसाठी साथी फेज-२ पोर्टलचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, या पोर्टलमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने विक्रेत्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकऱ्यांपर्यंत बियाण्यांचा पुरवठा वेळेवर होऊ शकत नाही, परिणामी शेतकऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अडचणींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेने तहसीलदारांकडे निवेदन दिले.
रावेर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर. डी. पाटील यांना हे निवेदन देण्यात आले, तर कृषी विभागात सहाय्यक कृषी अधिकारी सचिन गायकवाड यांनाही निवेदन सादर करण्यात आले. याप्रसंगी तालुका कृषी ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील, तसेच सुनील कोंडे, प्रदीप महाजन, रवींद्र बारी, हर्षल अग्रवाल, भगवान महाजन, युवराज महाजन, एकनाथ पाटील, एकनाथ महाजन, डॉ. जी. एम. बोंडे यांसह अनेक कृषी विक्रेते उपस्थित होते.
संघटनेने शासनाला स्पष्ट केले की, सध्याच्या स्वरूपात ‘साथी फेज-२’ पोर्टल पूर्णपणे अकार्यक्षम आहे आणि ग्रामीण भागातील इंटरनेट समस्यांमुळे शेतकरी व विक्रेते दोघेही अडचणीत सापडतात. त्यामुळे हे पोर्टल रद्द करून पारंपरिक विक्री प्रणाली सुरु ठेवावी, अन्यथा लाक्षणिक बंदानंतर पुढील तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.



