जळगाव प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात युवास्पंदन वार्षिक स्नेहसंमेलनाचे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डी.टी. पाटील यांचे शुभहस्ते जल्लोषात उदघाटन झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुप्त गुणांना चालना मिळण्यासाठी यांसारखे उपक्रम राबविण्याची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात हिरीरीने सहभागी होऊन स्व विकास घडवावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रा.संदीप गव्हाळे यांचे नेतृत्वात सहभागी 60 विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने मान्यवरांचे स्वागत करत, सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, शशिकांत वडोदकर,समन्वयक प्रा.एस.ओ.उभाळे, उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला, रांगोळी, चित्रकला, पोस्टर्स, फोटोग्राफी, मेहंदी, विविध छंद व वस्तूंची सौंदर्यपूर्ण प्रदर्शनी व श्रीकृष्णाच्या वेशभूषेत असलेली नियती वरयानी हिने उपस्थितांची मने जिंकली. उत्स्फूर्त भाषण व काव्यवाचन स्पर्धेत 31 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विविध सामाजिक, राजकीय, व निसर्ग विषयक कविता व विचार मांडले. युवा खाना-खजाना या उपक्रमात 30 विद्यार्थ्यांनी पाककलेचे उत्कृष्ट व रुचकर पदार्थांचे स्टॉल मांडले. तरुणाईने हास्य प्रधान खेळांचा आस्वाद घेत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. राहुल निंबाळकर,गणेश पाटील व हर्षाली चौधरी यांनी खाद्य पदार्थांचे परीक्षण केले. कवितांचं सादरीकरण, भाषणाच्या आवाज, ढोल-ताशांचा निनाद व सुबक रांगोळ्यांनी महाविद्यालयाचा परिसर उजळून निघाला. संगीताच्या सुरेल आवाजात सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या आनंदात भर म्हणून शिक्षकांसाठी देखील अंताक्षरीचे आयोजन करण्यात आले होते.त्याच बरोबर विद्यार्थ्यांनी गरबा राउंडमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत ठेका धरला.
उदघाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छाया चौधरी यांनी तर काव्यवाचन सत्राचे सूत्रसंचालन प्रा.अतुल इंगळे व विद्यार्थिनी श्रावणी सरोदे हिने केले. स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रा.दिनेश महाजन यांचे देखरेखीत उभारलेल्या रंगमंचावर अंताक्षरी, गीत गायन व वादन स्पर्धा, नृत्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यानंतर प्राचार्य डॉ.पी. आर.चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.संतम्मा वर्गीस, प्रा.प्रवीण महाजन , प्रा.सौ.किरण महाजन , प्रा.गणेश सूर्यवंशी , प्रा.प्रसाद देसाई, प्रा.स्वाती बरहाटे, प्रा.उमेश पाटील यांनी परिश्रम घेतले.