श्रीनगर, वृत्तसंस्था | दहशतवाद्यांसाठी लाँचपॅड म्हणून पाक व्याप्त काश्मीरमधील काही नागरिकांच्या घरांचा वापर करण्यात येत असल्याचा भारतीय लष्कराला संशय आहे. पीओकेमधील नागरिकांच्या घराजवळ अतिरिक्त एसएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय लष्कराचा संशय बळावला आहे. पीओकेमधील काही घरांजवळ सुरु असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींवर भारतीय लष्कराचे अत्यंत बारीक लक्ष आहे.
काश्मीरमध्ये अनेक भाग हे सध्या बर्फाने झाकले गेले आहेत. नौशेरा, सुंदरबनी, कृष्णा घाटी, भीमबेर गाली आणि पूँछ या भागामध्ये मोठया प्रमाणावर धुमश्चक्री सुरु आहे. पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या तोफगोळयांच्या माऱ्यामुळे या भागात तणाव निर्माण झाला आहे.
“पीओकेमधील अनेक नागरी घरांचा लाँचपॅड म्हणून वापर करण्यात येत आहे. आम्हाला त्याची पूर्ण कल्पना असून, आम्हाला ती घरे सुद्धा माहित आहेत. घुसखोरांना मदत करण्यासाठी म्हणून या घरांचा वापर करण्यात येत आहे” लेफ्टनंट जनरल हर्षा गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.
दहशतवादी थांबलेल्या या घरांना पाकिस्तानी सैन्य चौक्यांकडून संरक्षण देण्यात येत आहे. नागरिकांच्या नावाखाली सैन्याच्या हालचाली सुरु आहेत. २०१९ मध्ये नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या दुप्पट घटना घडल्या असून ५ ऑगस्टनंतर यामध्ये वाढ झाली आहे. पाच ऑगस्टला मोदी सरकारने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवले. त्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.