चोपडा, प्रतिनिधी | माचले (ता.चोपडा) येथे काल (दि.१५) रोजी दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास नाशिक पासिंग असलेल्या चारचाकी गाडीतून गावात आलेल्या तीन जणांनी अतुल विजय पाटील या नावाचा व्यक्ती कोण आहे ? अशी विचारपूस केली असता गावातील एका व्यक्तीने या नावाचे गावात कुणीच नाही, असे सांगितले. या लोकांचा संशय आल्याने गावकरी जमले असता गाडीतील लोकांनी पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गावकऱ्यांनी केलेल्या दगडफेकीत गावातील बाजार समितीचे सभापती जगन्नाथ दामू पाटील हे जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी की, गावात आलेल्या त्या गाडीतील तीन तरुणांपैकी एकाने विद्यमान उपसरपंच संतोष पाटील यांच्या घराचा फोटो डोंगर पाटील यांना मोबाईलमध्ये दाखवला त्यावरून त्यांनी घर पाहिल्यावर सांगितले की, आम्ही नंतर संध्याकाळी परत येऊ असे सांगून निघून गेले होते. त्यानंतर संबंधित चारचाकी गाडी (क्र.एम.एच.१५-एफ.२३३८) ही पुन्हा गावात आली. त्यावेळी गावकरी एकत्र जमले असल्याचे पाहिल्यावर गाडीमधील अज्ञात लोकांनी गाडी वेगाने चालवून ते पुढे घुमावल गावाकडे गेले. यावेळी गावकऱ्यांनी घाबरून घुमावल खुर्द येथील गावकऱ्यांना फोन केला. घुमावल खुर्द गावकऱ्यांनी ती गाडी येणार म्हणून रस्त्यात लाकडे आडवी टाकली. गाडीतल्या लोकांना पुढे रस्ता माहिती नसल्याने ते पुन्हा माचले गावाकडे परत आले. यावेळी माचले गावकऱ्यांनी तीन बैलगाड्या रस्त्यात आडव्या लावल्या, मात्र अश्या ही परिस्थितीत बैलगाड्यांना धडक देवून गाडीतील लोकांनी पळ काढला.
यावेळी त्या चारचाकी गाडीत हत्यारे असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.
बैलगाडया आडव्या लावल्या असताना गावकऱ्यांनी पळणाऱ्या कारवर जोरदार दगडफेक केली त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले, मात्र तरीही गाडी न थांबावता आतील लोक चोपड्याकडे पळून गेले.या दगडफेकीत बाजार समितीचे सभापती जगन्नाथ दामू पाटील यांना दगड लागल्याने त्यांच्या डाव्या डोळ्याला मोठी दुखापत होऊन चार टाके टाकावे लागले आहेत. त्यांच्यावर चोपडा येथील मोरेश्वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, आज (दि.१६) सकाळी चोपड़ा तालुक्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी रुग्णालयात जावून त्यांची भेट घेतली. या घटनेनंतर गावातील लोकांनी आलेल्या गाडीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता ती गाडी नाशिक जिल्ह्यातली असून रतन कडू या व्यक्तीच्या नावाने दिसत आहे. याबाबत अडावद पोलीस स्टेशनचे प्रभारी ए.पी.आय. मनोज पवार यांनी गाडीच्या शोधासाठी जिल्हयात नाकाबंदी केली असल्याचे कळले आहे.