दोन गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसासह संशयताला अटक: रावेर पोलिसांची कारवाई

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाकडून मध्यप्रदेश येथील सराईत गुन्हेगाराकडून २ गावठी पिस्तूल व २ जिवंती काडतूस एकुण ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिळालेल्या गोपनिय बातमीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेस समोर एक जण गावठी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी ११ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रावेर पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार तोफसिंग चतरसिंग चावला वय-२७ वर्षे रा. धसली ता. झिरण्या जि.खरगोण (मध्य प्रदेश) याला अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीच्या २ गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतूस असा ५१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्यावर रावेर पोलीस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि तुषार पाटील हे करीत आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोउनि तुषार पाटील, पोहेकॉ रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकॉ विकार शेख, पोकॉ अतुल गाडीलोहार यांनी केली आहे.

Protected Content