चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील वडगाव गावातील चौकात अवैधपणे गावठी कट्टा घेऊन परिसरात दहशत माजवीत असणाऱ्या संशयित आरोपीला अडावद पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचा पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी आढावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विलास अंतरसिंग बारेला वय-२४, रा,पाटचारी, अडावद ता. चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
चोपडा तालुक्यातील वडगावातील चौकात विलास बारेला हातात अवैधपणे गावठी पिस्तूल घेऊन दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने रविवारी ७ जुलै रोजी रात्री ८ वाजता कारवाई करत संशयित आरोपी विलास बारेला याला अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रूपये किंमतीचा गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल नासिर तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विलास बारेला याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जयदीप राजपूत करीत आहे.