यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील बाबूजीपुरा येथील ६ वर्षाच्या बालकाची अमानुषपणे हत्या करून मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे संपूर्ण शहरात आणि पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान चिमुकल्याची हत्या करणाऱ्याला संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. मृत बालकाचे नाव हनान खान असून तो मजीद खान जनाब यांचा मुलगा होता.
बालक बेपत्ता, नंतर मृतदेह आढळला
५ सप्टेंबर रोजी हनान अचानक बेपत्ता झाला. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु तो सापडला नाही. अखेर, रात्री त्यांनी यावल पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी शनीवारी ६ सप्टेंबर रोजी बेपत्ता झालेल्या हनानचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत शेजारील बंद घरातल्या वरच्या खोलीत आढळला. मृतदेह पाहून कुटुंबाला मोठा धक्का बसला. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती.

पोलिसांनी तात्काळ दखल घेत घरमालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने हनानची हत्या केल्याची कबुली दिली. मयताचे आजोबा यासीन खान नथ्थे रवान (वय ७४) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित आरोपी शेख शाहीद शेख बिस्मिल्ला (वय २२) विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. जळालेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. काल रात्री शेकडो लोकांच्या उपस्थितीत अत्यंत शोकाकुल वातावरणात हनानचा दफनविधी करण्यात आला.



