शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेंदुर्णी येथील इस्लामपुरा भागात घरफोडी करून घरातून रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शकीलाबी शेख सईद (वय-४०) रा. इस्लामपुरा, शेंदुर्णी ता. जामनेर या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ जून रोजी सायंकाळी ८ ते २७ जून रोजी सकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी सुलतान खान सुभान खान याने शकीलाबी शेख यांचे घराचा मुख्य दरवाजा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेले २ लाख ३० हजार रुपयांची रोकड आणि १ लाख २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत शकिराबी शेख सईद यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी सुलतान खान सुभान खान यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.