जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार हास्यजत्राफेम अभिनेते हेमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला.
रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. याच संघटनेची जळगाव जिल्हा शाखा २०१९ पासून अस्तित्वात आली.
जळगाव जिल्हा शाखेतर्फे दिला जाणारा रंगकर्मी पुरस्कार यंदा ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान यांना तर युवा रंगकर्मी पुरस्कार हास्यजत्राफेम अभिनेते हेमंत पाटील यांना प्रदान करण्यात आला. शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी आय.एम.आर.महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून केसीईचे सांस्कृतिक प्रमुख शशिकांत वडोदकर, केसीई व्यवस्थापन समिती सदस्य ॲड.प्रविणचंद्र जंगले, नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष ॲड.संजय राणे, नाट्यजागर कलेचा स्पर्धा समन्वयक दिलीप दळवी (मुंबई), डॉ.अनिल बांदिवडेकर (मुंबई) व विलास पागार (पालघर) यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ व पाच हजार रुपये रोख असे स्वरुप असणाऱ्या रंगकर्मी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कारप्राप्त सुषमा प्रधान
गेल्या ६० वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या श्रीमती सुषमा प्रधान या केवळ जळगावच्या रंगभूमीवरच नाही तर आकाशवाणी जळगाव केंद्राच्या नाट्यविभागातील ‘अ’ श्रेणी प्राप्त एकमेव महिला कलाकार आहेत. याशिवाय, शहरातील टेलिफोन खात्यातील प्रथम महिला टेलिफोन ऑपरेटर, युनियनच्या पहिल्या महिला सुपरवायझर, एकमेव महिला सेक्रेटरी अशी अनेक पदे त्यांनी भूषविली आहेत. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राची आवड असल्याने, अभिजात महिला मंडळ, सी.के.पी. समाज यांचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. सांस्कृतिक क्षेत्रात राज्य नाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा गाजविण्यासोबतच एस.टी.महामंडळ, कामगार नाट्य, महेश करंडक स्पर्धा, रोटरी क्लब, विवेकानंद प्रतिष्ठान, लोकमत सखीमंच, भुलाबाई महोत्सवासाठी त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर ‘मी सावित्री बोलतेय’ या एकपात्री प्रयोगाचे जळगाव जिल्हा, महाराष्ट्र व देशाच्या सीमा पार करुन सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत देखील त्यांनी प्रयोग सादर केले आहेत.
युवा रंगकर्मी पुरस्कारप्राप्त हेमंत पाटील
जळगावसारख्या शहरातील रंगकर्मी दूरचित्रवाहिनीवर झळकून अवघ्या महाराष्ट्रात सेलेब्रिटी म्हणून सुप्रसिध्द अभिनेता होऊ शकतो या गोष्टीला प्रत्यक्षात आणून शहरातील नव्या रंगकर्मींच्या आशेला ग्लॅमर प्राप्त करुन देण्यासोबत इथल्या बोलीभाषेला राज्यभरात लोकमान्यता महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून मिळवून देणारे अभिनेते हेमंत पाटील यांना युवा रंगकर्मी पुरस्कार देण्यात आला. शहरातील केसीई सोसायटीच्या मूळजी जेठा महाविद्यालयात एन.सी.सी.कॅडेट असतांना एक नाटक पाहण्याच्या निमित्ताने नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागात डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षीत होत नाट्यशास्त्रात पदवी व कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. महाविद्यालयीन जीवनातच मूळजी जेठा महाविद्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्यस्पर्धा व अनेक राज्यस्तरावरील एकांकिका स्पर्धा गाजवत अनेक पारितोषिके पटकावलीत. महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्यानंतरही रंगभूमीशी व आपल्या शहराशी असलेली नाळ कायम ठेवत मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचा प्रमुख म्हणून कार्यरत राहून जळगावातील नवीन कलावंतांची पिढी घडवत आहेत.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी अ.भा.मराठी नाट्यपरिषदेच्या कोषाध्यक्ष डॉ.शमा सराफ, मुख्य कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, सदस्य सुबोध सराफ, वैभव मावळे, दिनेश माळी, हर्षल पवार यांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ॲड.पद्मनाभ देशपांडे यांनी केले.