नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय लष्कराने म्यानमारच्या सैन्याबरोबर मिळून म्यानमारच्या सीमारेषेवर असलेले दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं नेस्तनाबूत केली आहेत. भारतीय लष्कराकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राइक केल्यामुळे दहशतवाद्यांमध्ये प्रचंड घबराहट पसरली आहे.
पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर आता भारतीय लष्कराने म्यानमार सीमेवरील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचे हे ऑपरेशन 17 फेब्रुवारी रोजी सुरू झाले होते. ऑपरेशन दोन आठवडे म्हणजेच 2 मार्चपर्यंत सुरू होते. म्यानमारमधील बंडखोर असलेल्या रोहिंग्या दहशतवादी समूहाने मिझोरामच्या सीमेजवळ नवे तळ बनवले होते. भारत आणि म्यानमारच्या सैन्याने संयुक्त मोहीम राबवत मिझोराममधल्या सीमावर्ती भागात नव्याने तयार करण्यात आलेल्या दहशतवादी शिबिरांना उद्ध्वस्त केले. तर या मोहिमेच्या दुसऱ्या भागात टागातील NSCN (K)च्या मुख्यालयावर निशाणा साधण्यात आला आणि अनेक शिबिरं नेस्तनाबूत करण्यात आली.