जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहचला असतांनाच माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
जळगावचे माजी आमदार, माजी मंत्री तथा जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाणारे सुरेशदादा जैन हे गेल्या दहा वर्षांपासून सक्रीय राजकारणापासून दूर होते. २०१४ साली त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकीय कार्यक्रमात दिसले नव्हते. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपण पुन्हा राजकारणात परतणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसे ते तांत्रीक दृष्टीने शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते. आज मात्र त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असतांना सुरेशदादा जैन यांनी शिवसेना-उबाठा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ते दुसर्या कोणत्या पक्षात जाणार का ? याबाबतची उत्सुकता देखील आता सर्वांना लागली आहे.