सुरत वृत्तसंस्था । येथून जवळच असणार्या हाजीरा येथील ओएनजीसीच्या प्लांटला आज पहाटे लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले असून यात तीन मोठे स्फोट झाल्याने परिसराला हादरे बसल्याचेही वृत्त आहे.
सुरत येथे असलेल्या ओएनजीसीच्या प्लँटमध्ये भीषण आग लागली. आज पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती ओएसनजीसीतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
दरम्यान, प्लँटमध्ये तीन मोठे स्फोट झाल्याचेही परिसरातील नागरिकांनी सांगितले. ओएनजीसी प्लँटमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन ठिकाणी आगीच्या ज्वाळा उठताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्लँटच्या जवळच असलेल्या पुलावरून जाणार्या एका व्यक्तीने चित्रीत केला आहे. दरम्यान, ओएनजीसीच्या हाझिरा प्लँटमध्ये पहाटे तीनच्या सुमारास लागोपाठ तीन स्फोट झाले असल्याच्या वृत्ताला सुरतचे जिल्हाधिकारी धवल पटेल यांनी दुजोरा दिला आहे.